Tuesday, January 2, 2024

अमृतवेल

 वेल जमिनीतून आत रुतून बसलेली आणि उंच उंच आभाळाला भिडलेली. अनेक रंगांच्या फुलांची,उन्हं पाऊस झेलून अगदी ताठ उभी आहे.... अमृतवेल... भाव भावनांच्या  विश्वात खिळवून ठेवते. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पात्र खरं आणि बरोबरच वाटत. कुणाचीच चूक नाही आणि कुणीच बरोबर नाही. फक्त पात्रच नाही तर पुराणातली आणि गोष्टीतल्या माणसांचेही मनाचा डोह गाठलाय. महाभारतातल्या सावित्रीच किंवा हॅम्लेटच्या आईच म्हणा, 

सीतेची सुवर्णमूर्ती पाहून संबंध अश्वमेध यज्ञात रामाच्या मनात चालत असलेला काहूर अगदी सुंदर टिपलंय लेखकानं . 

माणूस कितीही हुशार असला तरी समाजाची बांधिलकी त्यालाही पाहावीच लागते, एखाद्या धाडसी विचाराने कुणी झपाटला असेल तर त्याचे होणारे परिणाम ज्यालात्याला भोगावेच लागतात आणि त्याची तयारी असेल तेव्हाच त्याने ते अग्निदिव्य केले पाहिजे 

अश्वत्थामा जसा एकटा आहे आणि आपले अभागी चिरंजीवित्व घेऊन हिंडतो आहे तसाच माणूस सुद्धा एकटाच स्वतःच्याच हाताने करून बसलेल्या चुका माथ्यावरच्या जखमेसारखा घेऊन मिरवतो आहे.

नक्की वाचून बघा.... अमृतवेल  (वि.स. खांडेकर )




Tuesday, December 26, 2023

Abstract

 एक दिवस न मला देह विसरायचं अगदी असलेल्या व्याधींसकट 

विसरायचं मला माझा भूतकाळ आणि माझा वर्तमान 

वाढलेलं वय, असलेली नसलेली नाती, मैत्री 

कुठेच नाही लावायचं मन ना प्रेमात ना पूजेत 

अगदी कोर कोर व्हायचंय फ्रेश नव्या वाहीसारखं 

आणि आता लिहून काढायचीये नवीन कविता 

नव्या विचारांची ,नव्या आशेची स्वतःपूर्तीच मला आनंद देणारी 

वाचून काढायचाय एखाद पुस्तक भावविश्वाचं

जेणेकरून नव्याने माझ्या विचारांचा निचरा होईल

आणि मग मी तयार होईन

परत जायला 

तिथंच जिथून मला आज निघावास वाटतंय  


Arpit Amrut Rahamatkar 

Tuesday, April 30, 2013

ओव्या


||
भाकर भाकर सुर्व्या सारिखा आकार
माझा धनीग कष्टाळू, त्याचे पोट प्रेमाने भर
भाकर भाकर तुझा चंद्रा सारिखा आकार
माझा बाळ ग हळवा, त्याचे स्वप्न तू साकार
भाकर भाकर तुझा धरतीचा ग आकार
माझी लेक गुणी तिची ओटी सुखाने तू भर
भाकर भाकर माझ्या कुंकवाचा ग आकार
रोज माझ्या घरी पाव, असे  आमंत्रण स्वीकार
भाकर भाकर तुझा आकार ग गोल
मायेचा ग परीघ तुला उदर भरतीचा मोल
||
अर्पित

Wednesday, February 20, 2013

कवितेची एक ओळ..

कवितेची एक ओळ
आठवते माझी शाळा
मराठीच्या तासापूर्वी
सुरात लागत होता गळा

कवितेची एक ओळ
आठवतात शाळकरी मित्रे
शाईच्या पेनने शर्टवर्ती
काढली होती चित्रे

कवितेची एक ओळ
आठवतात कडक बाई
व्याकरणाची वही अपूर्ण
म्हणून दिली हातावरती लाई

कवितेची एक ओळ
आठवली तीच सुंदर मुलगी
उगाचच वही मागून वाटायचं
व्हावी तीचीमाझी सलगी

कवितेची एक ओळ
आठवतो तोच काळा फळा
त्यावरच मायेन गिरवून
शिकवला जीवनाचा धडा

कवितेची एक ओळ
नेते मला शाळेत माझ्या
अजून मन लहान होऊन
आठवली सारी मज्जा

अर्पित

Wednesday, October 31, 2012

आज माझ्या वेदनेला
||
आज माझ्या वेदनेला
लागली कुणाचीतरी नजर!
कारण आज फुटलाय,
तिच्या कठोर हृदयाला पाझर

आज माझ्या वेदनेला
लागली सुखाची चाहूल,
जेव्हा मला तिने  दिला
नजरेने प्रेमाचा  कौल

आज माझ्या वेदनेला
पडतात  तिचीच स्वप्ने
तिच्याच प्रेमात हरपून,
तिचीच आठवण जपणे

आज माझ्या वेदनेला
झालाय अनावर हर्ष
जसा झाला तिचा,
अलगद कोमल स्पर्श

आज माझ्या वेदनेला
माझ्या आयुष्यातून जावेलागले..
मनमाझे  तिच्या सोबत
तुला बघताच! बैमान वागले...
||
अर्पित

Friday, October 19, 2012

||

दोन साधू जीवांची
झाली गळाभेट
आरास प्रेमदिव्यांची
नामध्ये

एकाच मुखी
खाता घास
सर्वेच सुखासुखी
होतेतेंव्हा

काळ लोटला
झाली नाती जुनाट
आज नवीन खटला
जीवनात

वाजता तोंडे
झाले मन कटू
आता सारेच वेडे
एकामेकी

दूरचे डोंगरी
साजरा दिसता
म्हनुन बघावा घरी
बसुनिया

||

अर्पित

Saturday, October 13, 2012

लावणी


लावणी
||
पौर्णिमेच्या चंद्राच पाण्यात बिंब
चांदणी भिजलिया चंद्राच्या प्रेमात चिंब
ह्या मेनकेला आज प्रेमान तुम्ही शिवाल का?
आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)

ज्वानीच्या नावेत टाकल मी पाऊल
तुमच्या पिरतीची राया झाली मला चाहूल
राया मला ज्वानीच्या बोटेतून मिरवाल का?
आज रातीला  तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)

आज नशिबान रूपावर किमया केली
चंद्राच्या चांदण्यात चांदन न्हाली
ह्या रेशमी केसातून हात तुम्ही फिरवल का?
आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)

मदनाचा शिणगार करून मी बसले
राया तुमच विचार करीत खुदकन हसले
प्रेमान गजरा माझ्या केसात माळाल का?
आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?

अहो राया हिला आज रातीला तळ्याकाठी भेटाल  का?(कोरस)
||
अर्पित